Type Here to Get Search Results !

अंजनगावच्या तरुणाईचा 'स्वच्छता' जागर;वर्तमळा स्मशानभूमीने घेतला मोकळा श्वास!



​नेचर क्लबचा 'एक दिवस गावासाठी' उपक्रम; सार्वजनिक ठिकाणांचा कायापालट करण्याचा युवकांचा निर्धार


राहुल चव्हाण @रिपोर्टर​


अंजनगाव (ता. बारामती) :

"मी देणार माझा वेळ, माझ्या गावासाठी" असा ठाम निर्धार करत अंजनगाव येथील नेचर क्लबच्या सदस्यांनी श्रमदानातून गावाचा चेहरा बदलण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. ११) वर्तमळा येथील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या या परिसरातील काटेरी झुडपे आणि कचरा हटवल्याने स्मशानभूमीने जणू 'मोकळा श्वास' घेतला आहे.

​अंजनगावमध्ये 'नेचर क्लब'च्या माध्यमातून दर रविवारी 'एक दिवस गावासाठी' हा उपक्रम राबविला जातो. गावातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे आणि परिसर स्वच्छ व सुंदर बनवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. वर्तमळा स्मशानभूमी परिसरात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे आणि रानवेली वाढल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांना तिथे जाणेही कठीण झाले होते. नेचर क्लबच्या तरुणांनी एकत्र येत ही सर्व झुडपे तोडून परिसर स्वच्छ केला, तसेच तेथील वाटांचीही दुरुस्ती केली.

​वृक्षारोपण आणि संवर्धनाचा संकल्प

केवळ स्वच्छता करून न थांबता, येणाऱ्या काळात गावठाण, वाडी-वस्त्या आणि रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा व लावलेली झाडे जगवण्याचा (संवर्धन) संकल्प या युवकांनी केला आहे. या मोहिमेत ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

​यांनी गाजवले श्रमदान

या मोहिमेत नेचर क्लबचे सदस्य नवनाथ परकाळे, जालिंदर वायसे, मिलिंद मोरे, विजय सस्ते, सुर्यकांत मोरे, जगदिश परकाळे, मोहन चव्हाण, विजय परकाळे, वैभव मोटे, राहुल परकाळे, अक्षय परकाळे, विनोद मोरे, शकुल मोरे, अजय बामणे, मंगेश वायसे, प्रशांत परकाळे, दादा सस्ते यांनी सहभाग घेतला. त्यांना बाळासो वायसे, बापुराव सस्ते, ॲड. अनिल मोरे, भाऊ खोमणे या ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभले. श्री. संजय (नाना) परकाळे यांनी जेसीबी यंत्राचे सहकार्य व कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती.

​"गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. 'नेचर क्लब'च्या माध्यमातून आम्ही हा छोटासा प्रयत्न सुरू केला असून, संपूर्ण गाव स्वच्छ आणि हिरवेगार करण्याचा आमचा मानस आहे."


Post a Comment

0 Comments